सदानंद नाईक उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ उत्सव कार्यक्रमात शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला. यावेळी सामाजिक संस्था, गृहसंकुल, हॉटेल चालक आदींना कचरा इतरत्र फेकण्या ऐवजी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र घेण्याचे आवाहन केले.
उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी विभागाच्या वतीने स्वच्छ उत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख, उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्याच्या संकल्पनेतून कार्यक्रमाला हॉटेल चालक, गृहसंकुल पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, दुकानदार आदींना बोलाविण्यात आले होते. आयुक्त अजीज शेख यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून दुकानदार, हॉटेल चालक, गृहसंक आदींनी कचरा इतरत्र न फेकता घंटा कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन केले. तसेच अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असून हॉटेल चालकासह इतरांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र खरेदी केल्यास, कचऱ्याची जागीच विल्हेवाट लागून कचऱ्याचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे सांगितले.
शहरात घंटा कचरा गाड्या प्रत्यक्ष परिसरात फिरत असून नागरिकांसह गृहसंकुल, हॉटेल चालकसह इतरांनी कचरा घंटा गाडीत टाकावा. टप्याटप्याने शहरातील कचरा कुंड्याचे खत्ते बंद करून, शहर कचरा कुंडया मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी बोलून दाखविला. महापालिका प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करण्यात आले असून ठेकेदाराचे २७० कंत्राटी कामगार साफसफाई करीत आहेत. या साफसफाईच्या खाजगीकरणाला नागरिकांचा विरोध असलातरी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठेका देण्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे माजी नगरसेवक, कामगार संघटना, राजकीय स्थानिक नेते यांची याबाबत बोलती बंद झाल्याचा आरोप होत आहे.
सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था महापालिका स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचल्याचा आरोप होत आहे. तसेच वर्षाला कोट्यवधी रुपये खर्चूनही सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था झाल्याचे चित्र आहे.