कल्याण : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ११ आणि १२ जूनला अतिवृष्टी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी एनडीआरएफ टीमसोबत कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी पाहणी केली.
मनपा हद्दीतील नेतिवली आणि हनुमानगर लगतच्या टेकडी परिसराची त्यांनी पाहणी केली. टेकडीचा परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे टेकडीवर राहणाऱ्या २५ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याचा इशारा पाहणीदरम्यान आयुक्तांनी दिला आहे. त्याचबरोबर मनपा हद्दीत १६५ अतिधोकादायक इमारती असून, त्यापैकी ३२ इमारती मनपाने जमीनदोस्त केल्या आहेत. तसेच ६५ इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडे जाऊन रहावे, असे सूचित करण्यात आले. मात्र, ज्या नागरिकांच्या नातेवाइकांकडेही राहण्याची व्यवस्था नाही, अशा नागरिकांसाठी मनपाने शाळेत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. मनपा आयुक्तांनी शहरातील शिवाजीनगर, वालधुनी, रेतीबंदर परिसर, खडेगोळवली, तुकारानगर, आयरेरोड या ठिकाणीही पाहणी केली.
केडीएमसी सज्ज
९ जूनपासून अतिवृष्टी होईल, असा हवामान खात्याचा इशारा होता. त्यापूर्वी आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेऊन धोकादायक इमारती रिक्त करणे, होर्डिंग हटविणे, रेतीबंदर परिसरातील गोठे स्थलांतरित करून तेथील म्हशींची अन्यत्र व्यवस्था करणे, असे आदेश यापूर्वीच दिले आहे. दरम्यान, एनडीआरएफ टीमसोबत केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर मनपा अतिवृष्टीत नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये, यासाठी सज्ज झाली आहे.
-----------------------