मीरा रोड : मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या पाण्याची ठाण्याच्या माणकोली ते चेणेदरम्यान चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी स्टेम प्राधिकरणास पत्र देऊन चेणे येथील मीटर रीडिंगप्रमाणे देयक घ्यावे, असे म्हटले आहे.
स्टेम प्राधिकरणाकडून रोजचे ८६ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असून रोजच्या पाण्याच्या मोजणीसाठी माणकोली येथे मीटर बसविले आहे. या मीटरच्या रीडिंगच्या आधारे स्टेम प्राधिकरण मीरा-भाईंदर महापालिकेकडून पाण्याचे देयक वसूल करते. जून महिन्यात चेणे येथे पाणीमोजणीचे मीटर बसविल्यानंतर मात्र स्टेम प्राधिकरणाकडून रोजचे सुमारे सात ते आठ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत असल्याचे आढळून आले आहे. माणकोली ते चेणेदरम्यान ही पाणीचोरी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीचोरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, मीरा भाईंदरला रोज पाणी कमी मिळून पाणीटंचाई सहन करण्यासह न मिळालेल्या पाण्याचे पैसेसुद्धा स्टेम प्राधिकरणास भरायला लागून दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी या प्रकरणी स्टेम प्राधिकरणास पत्र लिहून चेणे येथे मिळणाऱ्या पाण्याच्या मीटर रीडिंगप्रमाणे पैसे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे स्टेम प्राधिकरण दाद देईल का, याकडे लक्ष लागले आहे.