- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फेरीवाल्यांवर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी चक्क सभात्याग केला. तत्पूर्वी ‘रागाच्या भरात मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल,’ असे वक्तव्य त्यांनी केले. आयुक्तांनी सभात्याग करुन महासभेचा अपमान केल्याबद्दल सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला व कामकाज सुरु ठेवले.पाटील यांनी शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईचे कौतुक करून आयुक्तांचे समर्थन केले. तसेच उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. परंतु, मी एक ठाणेकर असल्याने आणि मला जनतेने निवडून दिले असल्याने मल वाटते की, केवळ भावनेच्या भरात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेणे चुकीचे आहे. पाटील यांच्या टीकेमुळे दुखावलेले जयस्वाल म्हणाले की, आयुक्तांनी काय मार सहन करायचा का? संदीप माळवी यांचा मारहाणीत जीव गेला असता तर त्याचे कुटुंब मला काय बोलले असते, ते माझ्या कुटुंबांतील एक सदस्य आहेत, आणि त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्याकडे पोलीस बंदोबस्त व बाऊन्सर्स असतांना आपण कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पाटील यांनी आयुक्तांना करताच ते संतप्त झाले.याच मुद्यावरुन पाटील आणि आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली. आयुक्त संतापाच्या भरात म्हणाले की, पुन्हा मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी आयुक्तांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना मध्येच थांबवून तुमचे बोलणे चुकीचे असल्याचे सुनावले.- अवघ्या १० मिनिटांनंतर आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी सभागृहात प्रवेश केला. यावेळेस आयुक्तांनी हात जोडून सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद पाटील यांनी गावदेवी येथील त्या २८ बाधित गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. आम्ही आयुक्तांच्या कारवाईचे समर्थन करतो, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.