ठाणे: ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत अजूनही तेवढीच खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगत स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी जांभळी नाका मार्केट्स तसेच इतर मार्केट्सची पाहणी करून दुकानदारांनी आपला कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्याबरोबरच नागरिकांनी अनावश्यक गर्दी न करता नियामांचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. शहरातील अतिधोकादायक सर्व इमारती पावसाळ्यापूर्वीच पूर्णपणे रिकाम्या करण्यात आल्या असून सर्व धोकादायक इमारतींवर प्रशासन लक्ष ठेऊन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा ठाण्यात येऊन आढावा घेतला, कोविडचे प्रमाण कमी झाले असले तरी गाफील राहून चालणार नाही अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अजूनही शहरात तेवढीच खबरदारी घेतली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गणपती विसर्जन आणि पुढे सणांचा काळ असल्याने तसेच मार्केट्स उघडी झाल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे जांभळी नाका, मसाला मार्केट्स, याठिकाणी स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग या सर्व गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. एक चांगली गोष्ट म्हणजे सर्वच लोक मास्कचा वापर करत आहेत, त्यामुळे ठाणेकरांचे कौतुक करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
पावसाळा देखील सुरु असल्याने सफाईवर देखील भर देण्यात येत असून त्यामुळे इतर साथीचे आजार टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोडवर किंवा दुकानाच्या बाहेर कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली असून तशा सूचनाही दुकानदारांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सर्व दुकानदारांनी आपला कचरा दिवसभर आपल्या दुकानात ठेवायचा असून ज्यावेळी महापालिकेचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येतील तेव्हाच हा कचरा त्यांना द्यावा. मात्र कचरा दुकानाच्या बाहेर टाकता कामा नये अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
सफाई ही आमची जबादारीच आहेच ती आम्ही नाकारत नाही, मात्र आपल्या सर्वांची जबाबदारी देखील आहे. आता स्वच्छ अभियानात ठाणे राज्यात तिसऱ्या क्रमांवर असले तरी जर सर्वानी स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी घेतली तर पहिल्या क्रमांकासाठी आपण नक्की प्रयन्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे बिना मास्कचे लोक फिरत होते त्यांना थांबवून मास्क घाण्याचा सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या. बॅरिकेट्सचा ऊद्देश लोकांना त्रास देणे नसून गर्दीला आळा घालणे हा होता . कंटेनमेंट झोनमुळे हे बॅरिकेट्स लावण्यात आले होते .आता मार्केट्स उघडले आहे मात्र वाहनांची जास्त वर्दळ होऊ नये यासाठी हे बॅरिकेट्स लावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिधोकादायक ज्या इमारती आहेत त्या सर्व इमारती पावसाळ्यापूर्वीच रिकाम्या करून घेतल्या असून ज्या दुरुस्ती करण्यायोग्य इमारती आहेत त्यांना त्वरित इमारती दुरुस्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या इमारती आता पावसाळ्यात दुरुस्त करणे शक्य नाही त्या ठिकाणी अधिकारी वेळोवेळी पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले . जर परिस्थिती बिघडण्याची परिस्थिती होत आहे असे लक्षात आल्यास ती इमारत त्वरित खाली करण्यात येत असून ही प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे