मीरा राेड : मीरारोडच्या शांती गार्डनजवळील मोकळ्या भूखंडात गॅस सिलिंडर भरून असलेल्या ट्रकमध्ये ८ फेब्रुवारीला मध्यरात्री २ च्या सुमारास आग लागून झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या मालिकेप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांत या समितीला अहवाल सादर करायचा आहे.शांती गार्डनजवळील मोकळ्या मैदानात गॅस सिलिंडरने भरलेले दोन ट्रक उभे होते. त्यातील एका ट्रकला आग लागून लागोपाठ ६ सिलिंडरचा स्फोट होऊन मीरारोड हादरले. घटनास्थळापासून रहिवासी इमारती लांब असल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी नियमितपणे गॅस सिलिंडरचे ट्रक उभे केले जातात. अग्निशमन दलापासून आवश्यक परवानग्या न घेता हे सर्व बिनबोभाट सुरू असल्याने टीकेची झोड उठली.काशीमीरा पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकास अटक केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली, तर दुसरीकडे पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी या दुर्घटनेची चौकशी, तसेच अशा दुर्घटना घडू नये यासाठी अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे.कारणे शोधून उपाययोजनाही सुचविणारसमितीने सिलिंडर स्फोटाचे कारण शोधायचे आहे. वितरक व जमीन मालक कोण?, वाहनाचे मालक कोण?, सिलिंडर वाहनात भरून ते उभे ठेवायची परवानगी होती का?, आवश्यक दक्षता? आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे. समितीने शहरात भविष्यात असे अपघात घडू नये, म्हणून अग्निशमन विभाग व पालिकेने काय दक्षता? घेणे अपेक्षित आहे, याचे मुद्दे सुचवायचे आहेत. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेते तसेच फुगे विक्रेते यांना एलपीजी सिलिंडर कसे उपलब्ध होतात? प्रभागात अशा किती मोकळ्या जागा आहेत जेथे अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत व वाहने उभी केली जातात याचाही अहवाल सादर करायचा आहे.
गॅस सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटना रोखण्यासाठी आयुक्तांनी नेमली समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:34 AM