ठाणे : येथील गौतम विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांनी तीन जणांची समिती गठित केली आहे. समितीचे प्रमुख उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे असून समितीने शनिवारी मारहाण आणि इतर १४ मुद्द्यांवर शाळेत जाऊन तपासणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंदू मिशन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने गौतम विद्यालय चालवण्यात येते. संस्थेच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी राग अनावर झाल्याने बुधवारी विद्यार्थ्यांना फायबर काठीने मारहाण केल्याची तक्रार पालकांनी ठाणेनगर पोलिसांत केली. पोलिसांनी १८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शुक्रवारी शिल्पा गौतम यांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हा ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली. त्यांनी ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाºयांना पत्रव्यवहार करून शाळेवर प्रशासकीय अधिकारी नेमण्याची सूचना केली. त्यानुसार, समिती गठित करण्यात आली.विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या सूचनेनंतर तातडीने उपशिक्षणाधिकारी यांच्यासह तीन जणांची समिती गठित केली. त्या समितीचा अहवाल सादर झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.- मीना शेंडकर-यादव, शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
चौकशीसाठी तीन जणांची समिती, ठाण्यातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:45 AM