ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकार यांच्यातील योग्य समन्वय ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून साधला जाणार आहे. यासाठी समितीअंतर्गत ठाणे गणेश मूर्तिकार संघाची सुरुवात करण्यात आली आहे. मूर्तिकारांना जागेची अडचण असून ती प्रशासनाने सोडवून तीन महिन्यांसाठी महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्यासह इतर मागण्या समितीमार्फत केल्या जाणार आहेत.
मूर्तिकारांच्या समस्यांचे निराकारण व्हावे आणि एकत्र येऊन त्यांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, या हेतूने या संघाची स्थापना समितीने केली आहे. समिती स्थापन झाल्यापासून मंडळांच्या प्रश्नांवर काम करीत आहे. ठाणे जिल्ह्यात मूर्तिकार एकत्र नाहीत त्यामुळे त्यांच्या समस्या एकत्रितपणे प्रशासनाकडे मांडता येत नाहीत. हे लक्षात घेऊन सर्व मूर्तिकारांनी समितीशी जोडण्याचे आवाहन समिती अध्यक्ष समीर सावंत यांनी केले आहे. आतापर्यंत ३० मूर्तिकार समितीशी जोडले गेले आहेत, असेही ते म्हणाले. पीओपी गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून त्यावर काही पर्याय काढता येईल का, याबाबत प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात समितीने मूर्तिकारांशी चर्चा करून त्यांची मते घेतली असता मूर्तिकारांना जागेची समस्या वर्षानुवर्षे जाणवत आहे. ठाणे महापालिकेच्या अनेक जागा तशाच पडून आहेत. गणेशोत्सव काळात तीन ते चार महिन्यांसाठी त्या भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेस निधी मिळेल आणि मूर्तिकारांना जागाही उपलब्ध होईल. बाहेर जागा घ्यायची झाल्यास त्यांना ३० ते ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते. त्यामुळे कमवणार की भाडे देणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो, याचा महापालिका प्रशासनाने गंभीर विचार करावा, अशी मागणी समितीने मूर्तिकारांच्या वतीने केली आहे.