ठाणे : पूर्वी एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जात होता. त्यामध्ये बराच कालावधी निघून जात होता. आता मात्र सोशल मीडियामुळे तक्रारींचे निरसण करणे सोपे झाले असून ठाणे महापालिकेच्या टिष्ट्वटर अकाउंटच्या या ई-चिठ्ठीमुळे सर्वांच्याच समस्या तत्काळ सुटू शकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे याउपस्थित होत्या. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सभागृह नेते नरेश म्हस्के, राम रेपाळे, भाजपचे गटनेते नारायण पवार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिकेतही अशा पद्धतीने पेज तयार केले असून महिनाभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी एखाद्या ठिकाणची समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी नगरसेवकापासून ते महापालिकेपर्यंत विविध विभागात नागरिकांना जावे लागत होते. मात्र, आता या पेजमुळे तुम्ही तुमच्या प्रभागातील तक्रारी, समस्या टाकू शकता आणि त्याची सोडवणूक सुद्धा नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरसेवकांनीही नागरिकांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. नाही तर, आपल्याकडे तक्रार न करता आपल्या प्रभागातील नागरिकाने अशा थेट तक्रार का केली असा कांगावा करण्याची काहीच गरज नाही. उलट तुम्हीही या माध्यमातून टिष्ट्वटर पेज हॅन्डल करा, जेणे करून तुम्हालाही आपल्या प्रभागातील समस्या या तत्काळ सोडविण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. शिवाय पालिकेने या पेजच्या माध्यमातून पालिकेतील इतर विभागदेखील त्याला जोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम आपल्याला राबवायची असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पालिका आणि लोकप्रतिनिधींची - एकनाथ शिंदेया पेजच्या माध्यमातून ठाणेकरांनी तक्रार केल्यास त्या तत्काळ सोडविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असणार आहे. आजच्या काळात तक्रारींचे निरासरण करण्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळेच ही संकल्पना सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी बरोबरच पालिका प्रशासनाचीही आहे.