ठाणे - मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठीतून संवाद साधण्याची शपथ घेऊया. संवाद करताना चूक झाली तरी हरकत नाही पण किमान घरी मराठीत संवाद साधा असे आवाहन बाळ कांदळकर यांनी ठाण्यात केले.
आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त 'मराठी भाषा, मराठी शिक्षण कायदा आणि भाषा प्राधिकरण या उपक्रमांतर्गत युवा परिसंवादाचे आयोजन आनंद विश्व गुरुकुल शाळेत करण्यात आले होते. या परिसंवादासाठी बाळ कांदळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते, मराठी भाषेचे भवितव्य तरुणपिढीच्या हातात आहे . इंग्रजी ही प्रगतीची भाषा आहे ,पण मराठी भाषा यायला हवी. आपल्या भाषेचा पाया कच्चा असेल तर कोणी प्रगती करू शकत नाही. त्यामुळे मुलांना मराठी शाळेत घालण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. केवळ एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करण्यापेक्षा वर्षभर मराठी भाषा दिन साजरा करावा . असे मत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयलयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी व्यक्त केले. इतर प्रांतात आणि परदेशात मराठी भाषा जोपासली जाते त्यामुळे आपाल्या राज्यात देखील मराठी भाषा आणि संस्कृती चे जतन केले पाहिजे असल्याचे नमूद केले. तर मातृभाषा वगळल्यावर आपले अस्तित्व उरत नाही. त्यामुळे आपली भाषा जोपासली पाहिजे . परदेशात मराठी भाषेची रुजवात करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था कार्यशील आहेत .लेखक ,कवी ,नाटककारांनी ही भाषा समृद्ध केली असून अशा या भाषेसाठी आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा मेघना साने यांनी व्यक्त केले. दरम्यान या कार्यक्रमात युवा प्रतिनिधींनी मराठी भाषेबाबत आपले विचार विविध संदर्भ देऊन व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी सुचित्रा भगवते , प्रा. अर्चना माळवी आदी मान्यवर या परिसंवादाला उपस्थित होते. या परिसंवादाचे निवेदन प्रा. दीपा ठाणेकर यांनी केले.