वाडा : तालुक्यातील शेला येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. सुमारे २५ तास घेराव आंदोलनानंतर पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले असून संबंधीतावर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आला. दरम्यान, या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्याने उपोषण कत्या चार ग्रामस्थांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आठ दिवस उलटूनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्याकडे गांभीर्याने बघत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून याचा जाब विचारला. दरम्यान, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे या मिटींगसाठी बाहेर गेल्याने आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली नव्हती. त्यामुळे घेराव आंदोलन रात्रभर सुरूच राहीले.बुधवारी दुपारी गटविकास अधिकारी यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल व पाणी पुरवठा योजनेचे काम मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)
कम्युनिस्टांचे घेराव आंदोलन २५ तासानंतर मागे
By admin | Published: January 05, 2017 5:33 AM