ठाणे : नेदरलॅण्डच्या कॅब जेमिनी या कंपनीने महाराष्ट्रातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये पुणे आणि ठाण्यातील शाळांचा समावेश आहे. त्यानुसार, बुधवारी या कंपनीतील शिष्टमंडळाने महापालिकेच्या शाळा क्र मांक ९७ ला भेट दिली. महापालिकेच्या तीन शाळा या कंपनीने दत्तक घेतल्या असून येत्या काळात या शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसवण्याबरोबरच शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस या शिष्टमंडळाने व्यक्त केला. यामुळे महापालिकेच्या शाळाही यानिमित्ताने हायटेक होऊन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळून सोलर पॅनल बसविल्यामुळे विजेचीही बचत होणार आहे.महापालिका शाळांतील विद्यार्थी हे गरीब घरांतून आलेले असतात. परंतु, त्यांनाही आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी ही कंपनी ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक ९७ दत्तक घेऊन ती पूर्णपणे सोलरयुक्त करणार आहे. याशिवाय, या शाळेचा अभ्यासक्रम अत्याधुनिक पद्धतीने मुलांना शिकता येईल, यावरदेखील भर देणार आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांपासून या शाळेवर काम करण्यास सुरुवात केली. शाळेतील डिजिटल बोर्ड, मुलांना सोप्या भाषेत समजेल, असे काही सॉफ्टवेअर या शाळेत शिकवण्यास सुरु वात झाली आहे. हेच बघण्यासाठी या कंपनीतर्फे नेदरलॅण्डमधून काही पाहुणे शाळेची पाहणीस आले, तेव्हा मुलांनी त्यांचे स्वागत भारतीय पारंपरिक पद्धतीने लेझीम पथकाद्वारे केले. याचबरोबर या शाळेतील मुलांनी केलेले प्रयोगदेखील या पाहुण्यांनी बघितले. या शाळेत एकूण १७० विद्यार्थी आहेत.विद्यार्थ्यांमध्ये वाढली गोडीजेव्हापासून या शाळेत ई-लर्निंग, कॉम्प्युटर लॅब आणि इतर अध्याधुनिक सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे, तेव्हापासून या शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यासाप्रति गोडी वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे. घोडबंदर भागातील जकातनाक्यावर ही शाळा सुरू असून ओवळा आणि अचानकनगर, मुंब्रा येथील शाळाही या कंपनीने दत्तक घेतल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.
नेदरलॅण्डच्या कंपनीकडून पालिकेच्या शाळा दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:08 AM