ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीत दोन वर्षांपूर्वी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. जॉइंट व्हेंचरमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार होती. ज्या कंपनीसोबत जॉइंट व्हेंचर केले जाणार होते त्या कंपनीऐवजी निविदा प्रक्रियेत सहभाग न घेतलेल्या कंपनीला हे काम दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवरच उपचार करण्याची गरज असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत ‘आप’च्या सरकारने मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील पाच वर्षांत पालिका १६० कोटींचा खर्च करणार आहे. शहराच्या विविध भागात एकूण ५० दवाखाने (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळतात त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खासगी संस्थेला द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच या योजनेला विरोध होता.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते यातील पाच दवाखान्यांचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षात एकही नवा दवाखाना संबंधित संस्थेला सुरू करता आला नाही. त्यामागचे धक्कादायक कारण आता उघड झाले असून संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली आहे. जॉइंट व्हेंचरमध्ये राबवण्यात येणाऱ्या ‘आपला दवाखाना’ या संस्थेला या कामाचा कार्यादेश देणे अपेक्षित होते. परंतु या कंपनीतील एक भाग असलेल्या दुसऱ्या कंपनीलाच हे काम देण्यात आले आहे. ही दुसरी कंपनी या निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. ११ जुलै २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हे कार्यादेश देण्यात आले. जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीने या विरोधात पालिकेला नोटीस बजावली असून १५ दिवसात याचे उत्तर द्यावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
वन रुपी क्लिनिकच्या ‘त्या’ ठेकेदाराने केली फसवणूक
ज्या कंपनीला कार्यादेश देण्यात आला त्या कंपनीला हे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या कंपनीने ४९ टक्के शेअर देत हे काम वन रुपी क्लिनिकला दिले. वन रुपी क्लिनिकने यासाठी १ कोटी ६६ लाखांचा खर्च करून मागील दोन महिन्यांपासून शहरात तब्बल २० ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत. प्रत्येक दवाखान्यात रोजच्या रोज ८० ते १०० रुग्ण ओपीडीला येत आहेत. त्यात रुग्णांकडून फी आकारली जात नाही. गेले दोन महिन्यांच्या कामाचा मोबदला मिळावा यासाठी वन रुपी क्लिनिकने जेव्हा पालिकेकडे पत्रव्यवहार केला. तेव्हा त्यांच्याही लक्षात हा घोळ आला. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीकडे केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून संपर्क केला. परंतु ज्या कंपनीने निविदाच भरलेली नाही व त्यामुळे त्यांना काम मिळालेले नाही, त्या कंपनीच्या नावाने केलेल्या कामाचा धनादेश कसा निघणार, असा पेच उभा ठाकला आहे.
सुदैवाने पालिकेने अद्याप बिल काढले नाही
यामध्ये जॉइंट व्हेंचर कंपनीची व वन रुपी क्लिनिकची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता धनादेश कसा काढावा, असा पेच निर्माण झाल्याने पालिकेने ज्या कंपनीला कार्यादेश दिला त्याला सुदैवाने अद्याप बिल दिलेले नाही. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत लागलीच काहीही माहिती देणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...........
मागील दोन महिन्यांपासून आम्ही शहरात ‘आपला दवाखाना’ सुरू केला. यासाठी १ कोटी ६६ लाखांचा खर्च केला आहे. परंतु पालिकेने केलेल्या चुकीचा नाहक भुर्दंड आम्हाला सहन करावा लागत आहे. आम्ही केलेल्या कामाचे पैसे मिळत नसतील तर आपला दवाखाना सुरू ठेवणे शक्य होणार नाही.
- डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक
...........
वाचली