लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल केवळ रोजच नव्हे, तर मिनिटाला होत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट जगात अटीतटीची स्पर्धा पाहिली जाऊ शकते, असे स्पष्टीकरण देताना आयसीएआयच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सीए जय छैरा यांनी काही कंपन्यांचे उदाहरण देत आजच्या व्यवसायाची तुलना साप आणि शिडीच्या खेळाशी केली. व्यवसायाच्या क्षेत्रात समज किती महत्त्वाची आहे, हे सूचित करताना ते म्हणाले की, खर्च कमी करणे आणि महसूल वाढवणे हे कंपनीचे एकमेव लक्ष्य नसावे. त्यापेक्षा अधिक कंपनीने ग्राहकांची मानसिकता समजून घेण्यात गुंतले पाहिजे आणि त्यानुसार नवकल्पना आणली पाहिजे.
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या लेखा विभागाने डब्ल्यूआयसीएएसए ठाणे शाखेच्या सहकार्याने इनोव्हेट ऑर इव्हापोरेट या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी छैरा बोलत होते.
ठाणे डब्ल्यूआयसीएएसए शाखेचे अध्यक्ष सीए रजनीश शर्मा व विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला लेखा विभाग प्रमुख सी.ए. प्रा योगेश प्रसादे यांनी व्यवसायातील नावीन्यपूर्ण विषयावर असे व्याख्यान देण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. प्रियंवदा टोकेकर, डॉ. महेश पाटील, ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे तसेच, विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. सीए मधुरा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
नवकल्पनांवर टाकला प्रकाश
छैरा यांनी विशेषतः खासगी कंपनीच्या नवकल्पनांवर प्रकाश टाकला. व्यवसाय आणि कॉर्पोरेट जगताच्या बाबतीत नावीन्यता फक्त दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे. ते दोन विभाग कल्पना आणि अंमलबजावणी आहेत. त्वरित अंमलबजावणीसह नवीन कल्पना एका महान नावीन्यतेला जन्म देते, जे नफ्यात योगदान देईल तसेच दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करेल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
------------------------