ठाणे : तौक्ते चक्रीवादळाने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या घरांंसह शेती, भाजीपाला, उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना आवश्यक भरपाई मिळवून देण्यात यावी, यासाठी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन नुकसानीचा अहवाल त्यांना दिला आहे.
ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर ही शहरे बहुतांश खाडीकिनारी वसलेली आहेत. चक्रीवादळामुळे या खाडी किनारपट्टीवरील, भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे तसेच त्यांच्या राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाईंदर पश्चिम भागातील गावांमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाणे घोडबंदर पट्ट्यातील कोलशेत, वाघबीळ, बाळकुम, कासारवडवली, मोगरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, नागले या गावातील शेती करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीकडे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
नवी मुंबईतील खाडीकिनारी असलेल्या गावठाणातील व पामबीच मार्गावर, सानपाडा मोराज सर्कलजवळ विशाल नारळकर या तरुणाचा विद्युत पोल अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
---------
गेल्या वर्षी चक्रीवादळादरम्यान उत्तनच्या मासेमारी हंगामात मासेमारी करता आली नाही, यासाठी राज्य शासनाने या मच्छीमारांना आर्थिक साहाय्य घोषित केले आहे. त्यामध्ये दोन हजार ८१४ लाभार्थ्यांना मच्छीमारनौका व मासळीविक्रेता महिलांना तीन कोटी ७० लाखांची मदत मिळवून दिली याबद्दल खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.
----------
* खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर शहरासाठी स्मशानभूमी व दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे.
---------