लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या धडकेत पोलीस वाहनातील ४७ वर्षीय हवालदाराचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या नातेवाइकांना ५६ लाखांची भरपाई देण्याचे आदेश ठाणे मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाने गुरुवारी दिले आहेत. ट्रेलरमालक आणि रिलायन्स विमा कंपनीला ही भरपाई सात टक्के व्याजाच्या दराने पोलीस हवालदाराच्या नातेवाइकांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे यांनी दिले आहेत.
ठाणे ग्रामीणचे ४७ वर्षीय पोलीस हवालदार प्रमोद निवतकर (नेमणूक वासिंद पोलीस ठाणे) हे २८ डिसेंबर २०१६ ला मुंबई-नाशिक महामार्गावरून त्यांच्या पोलीस जीपने प्रवास करीत होते. त्यावेळी कोणताही दिवा न लावताच रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला या जीपची धडक बसली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला होता.
ट्रेलर चालकाने कोणताही सिग्नल न देता, बेफिकिरीने रस्त्यातच तो उभा केल्यामुळेच हा गंभीर अपघात झाल्याचे न्यायाधिकरणाचे वकील एच. पी. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. कुटुंबातील एकमेव कमवते असलेल्या प्रमोद यांना ४६ हजार ६८२ इतके वेतन होते. विमा कंपनीने प्रकरण दाखल करूनही ट्रेलर मालक हजर झाला नव्हता. त्यामुळे हे प्रकरण निश्चित झाले. परावर्तकांशिवाय रस्त्यावर वाहन उभे करणे हे अत्यंत धोक्याचे आहे, हा ट्रेलर चालकाचा अक्षम्य गुन्हा असल्याचे निरीक्षणही न्यायाधिकरणाने नोंदविले. त्याच पार्श्वभूमीवर प्रमोद यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने प्रत्येकी १५ लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतविण्यात यावेत. तसेच १० लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावाने आणि पाच लाख रुपये त्यांच्या वयस्कर आईला, तर उर्वरित ११ लाखांची रक्कम पत्नीला धनादेशाने देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने बुधवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----------------