- जितेंद्र कालेकरठाणे : ‘तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन मला मारण्यासाठी अंगावर येऊन जोरजोरात भांडण करीत आहेत,’ असा फोन करून प्रमिला साळवी (५२) यांनी मुलगा प्रसाद साळवी (२४) याच्याकडे मदतीसाठी याचनाही केली होती. परंतु, प्रसाद कार्यालयातून घरी येईपर्यंत खूप उशीर झाला होता. तोपर्यंत मदत मागणारी त्याची आई आणि वडील दिलीप हे दाेघेही रक्ताच्या थाराेळ्यात निपचित पडले होते.
कळव्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर दिलीप यांचा मुलगा प्रसाद साळवी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती समोर आली आहे.कळव्यातील बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी (५८) यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रमिलावर परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ही घटना १ सप्टेंबर २०२३ रोजी ९ वाजून ५९ मिनिटांच्या सुमारास घडली. घटनेआधी पाच मिनिटेआधी म्हणजे ९ वाजून ५४ मिनिटांच्या सुमारास प्रमिला यांनी कळव्यातीलच मनीषा नगरातील तरण तलावाजवळील न्यू भाग्यदीप इमारतीमध्ये आपल्या कार्यालयात असलेला मुलगा प्रसाद याला मोबाइलद्वारे आपल्यासमोरील जीवघेण्या संकटाची माहिती दिली होती. यामुळे क्षणाचाही विलंब न करता नॅशनल हॉटेलच्या मागील कुंभारआळीतील यशवंत निवास बंगलो या घराकडे मोटारसायकलीवरून प्रसाद याने धाव घेतली.
मोटारसायकल घराच्या बाहेर उभी करीत असताना आतून गोळीबाराचा आवाज प्रसादला आला. मुख्य दरवाजातून प्रसाद घरात आला. हॉलमध्येच सोफ्याच्या समोर आई प्रमिला जखमी आणि पालथ्या अवस्थेत पडलेली त्याला दिसली, तर वडील दिलीप हे सोफ्याच्या कडेला मान खाली व त्यांच्या तोंडातून रक्त येत असलेल्या बसलेल्या स्थितीत दिसल्याचे प्रसादने कळवा पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. डावखुरे असलेल्या दिलीप यांच्या डाव्या हातात रिव्हॉल्व्हर होते, तर उजव्या हातामध्ये गाडीची चावी होती. त्यावेळी प्रसादच्या पाठोपाठच त्याचे मित्रही घरात शिरले. प्रसादने डॉक्टरांना बोलविले. मात्र, तोपर्यंत दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
मुलगा घरात असता तर...दिलीप आणि प्रमिला यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून त्या दिवशीही वादाची ठिणगी पडली. वाद विकोपाला गेला. दिलीप यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर पाहून प्रमिला यांनी मुलाला मोबाइलद्वारे आलेल्या संकटाची माहितीही दिली; पण तो पोहोचण्यापूर्वीच दिलीप यांनी पत्नीचा खून केला होता. जर तो आणखी काही मिनिटे आधी पोहोचला असता तर प्रमिला यांचा जीव वाचविता आला असता, अशीही चर्चा होती.