डहाणू : डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यातील वाद विकोपाला गेलेले असतानाच आता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोहिंगतन झाईवाला यांनी सन २०१३ ते २०१६ या कालावधीत नगर परिषदेतील विविध विकासकामांच्या जमा अनामत रकमेबरोबरच बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणे आणि अनियमित भोगवटा प्रमाणपत्र देणे याविरोधात डहाणूच्या साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पिंपळे यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असून त्यांच्या बदलीचे संकेत मिळत आहेत.डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी यापूर्वीच्या सेवा कार्यकाळात नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामे करताना ठेकेदारांकडून निविदा प्रक्रिया संहितेनुसार कामांची विशिष्ट दराने अनामत रक्कम जमा केली होती. ही रक्कम कामे पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना न देता इतरत्र खर्च केली. सुमारे तीन कोटी ५० लाख रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा उल्लेख झाईवाला यांनी पत्रात केला आहे. तसेच भोगवटा प्रमाणपत्र आणि बांधकामात अनियमितपणा केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. १५ पैकी १२ प्रकरणांत विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अहवालात नमूद केले आहे. पिंपळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात आतापर्यंत आमदार, खासदार, तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सुरक्षा अनामत ठेव हा नगरपालिका फंडाचा भाग आहे व तो आवश्यकतेनुसार गरज पडेल तेव्हा वापर करण्याची तरतूद आहे. तसेच सर्व परवानग्या भोगवटा कायद्यानुसार दिलेल्या आहेत.- अतुल पिंपळे, मुख्याधिकारी डहाणू नगर परिषद, डहाणू
डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:27 PM