अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागातील पाठारे पार्कजवळील शिव साई कृपा इमारतीचा पुनर्विकासावरून माजी नगरसेवक आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. बांधकाम व्यावसायिकाने माजी नगरसेवकाविरोधात पैसे मागत असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने शिव साई कृपा या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या इमारतीच्या एका गाळ्यात माजी नगरसेवक अशोक गुंजाळ यांचे कार्यालय भाडेतत्त्वावर होते. ही इमारत विकासकाला दिल्यानंतर गुंजाळ यांनी संबंधित बांधकाम व्यवसायिक ज्ञानधर मिश्रा यांना संबंधित गाळ्याच्या मोबदल्यात गाळा किंवा पैसे द्यावेत, अशी मागणी केल्याचा आरोप मिश्रा यांनी तक्रारीत दाखल केला आहे. त्यांची ही मागणी मान्य न केल्याने माजी नगरसेवकाने संबंधित बांधकामाची तक्रार नगरपालिकेकडे केली. त्यासाठी पत्नी या सध्या नगरसेवक नसताना नगरसेवकाचे लेटरहेड केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. अखेर गुंजाळ यांच्या विरोधात मिश्रा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
‘तक्रारीत तथ्य नाही’
माजी नगरसेवक अशोक गुंजाळ यांना विचारले असता त्यांनी मिश्रा यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. त्या ठिकाणी इतर सोसायटीची जी असोसिएशन आहे त्यांनी आपल्याकडे संरक्षक भिंत बेकायदा उभारली जात असल्याची तक्रार केली होती. त्याअनुषंगाने आपण संरक्षक भिंतसंदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पैसे मागण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. यासंदर्भात आपण पोलिसांकडे आपली बाजू मांडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
----------/--------/-----------/