लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून लोकांची वाहने पळवणाऱ्या भिवंडीच्या मयूर तांबोळीविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी वाढत आहेत. रविवारी त्याच्याविरुद्ध ठाण्यातील एका रहिवाशाने तक्रार दिल्यानंतर अशाच स्वरूपाच्या तक्रारी डोंबिवली आणि वाशी येथूनही आल्या आहेत.ठाण्यातील भक्ती मंदिर रोडवरील एका रहिवाशाची कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून भिवंडी येथील अंबिकानगरचा रहिवासी मयूर रत्नाकर तांबोळी त्यांची कार घेऊन फरार झाला. बराच पाठपुरावा करूनही कार मिळत नसल्याचे पाहून या तक्रारदाराने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, मयूरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता या ठगाचा आणखी एक कारनामा डोंबिवलीतही उघडकीस आला आहे. डोंबिवली येथील मकरंद बिरारी यांना त्यांची निस्सान कार गोरेगाव येथील चित्रनगरीत भाड्याने लावण्याचे आमिष मयूरने दाखवले होते. त्यासाठीचा करारनामा मे महिन्यात करून त्याने बिरारी यांच्याकडून पाच हजार रुपये उकळले. बिरारी यांची कार त्यांच्याजवळ असली, तरी कारची एक चावी मयूरकडे आहे. त्यामुळे कार चोरी होण्याची भीती असल्याने बिरारी यांनी मयूरविरुद्ध मानपाडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याशिवाय, वाशी येथील एका पत्रकाराच्या नातलगासही मयूरने फसवल्याची माहिती समोर आली आहे. मयूर हा सराईत ठग असून पळवलेल्या वाहनांचा तो दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी बिरारी यांनी केली आहे.
गाड्या पळवणाऱ्या मयूरविरुद्ध तक्रारी
By admin | Published: June 10, 2017 1:06 AM