मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवासुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, होणारा हलगर्जीपणा आदींना वचक बसवण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना नागरिकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवल्या आहेत. रुग्ण व नागरिकांच्या तक्रारींवर दोन आठवड्यांत केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराच्या घरपोच केली जाणार आहे.मीरा-भाईंदर महापालिकेची ९ आरोग्य केंद्र तर २ उपकेंद्र आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना सर्वसाधारण आजार, लसीकरण आदी सुविधा माफक दरात मिळत असल्याने तेथे नागरिकांची नेहमीच गर्दी असते. तर पालिकेच्या मीरा रोड येथील इंदिरा गांधी व भार्इंदर येथील भीमसेन जोशी रुग्णालयात देखील ओपीडीत रांगा लागलेल्या असतात.तसे असले तरी रुग्णालयातील ओपीडी खासगी डॉक्टर चालवत असल्याने तपासणीसाठी येणा-या रुग्णांना काही जण थेट आपल्या रुग्णालयात उपचारासाठी पाचारण करतात. शिवाय रुग्णालय केवळ नावा पुरतेच असून तेथे गंभीर आजार, अकस्मात अपघात वा अन्य कारणांनी येणा-या रुग्णांना मात्र रुग्णालयात तातडीची आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. अनेक वेळा तर पालिकेच्या रुग्णालयातील हलगर्जीपणा रुग्णांच्या जिवावर बेतला असून, पालिकेचे रुग्णालय तर नेहमीच वादग्रस्त ठरलं आहे. त्यातच येणारे रुग्ण वा त्यांचे नातेवाईकांना उपचार व वैद्यकीय सुविधेबद्दल वाईट अनुभव आले तरी तेथे कोणी दाद देत नव्हते.अखेर या प्रकरणी कृष्णा गुप्ता ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्या सत्यकाम फाऊंडेशनमार्फत रुग्णालयात तक्रारनोंद वही ठेवण्याची मागणी गेल्या वर्षापासून लावून धरली. पालिकेने देखील वेळकाढूपणा करत का होईना अखेर प्रशासनाला जाग आली व सर्व आरोग्य केंद्र, रुग्णालयांमध्ये पिवळ्या रंगाची तक्रार नोंद पुस्तिका ठेवण्यात आली आहे. सदर नोंदवहीत तक्रारदाराने आपली माहिती देतानाच तक्रारीचे स्वरुप तसेच उपलब्ध असले तर साक्षीदार यांची माहिती द्यायची आहे. सदर तक्रार पुस्तिकेवरून आवश्यक कार्यवाही केली जाणार असून दोन आठवड्यात कार्यवाहीची माहिती लेखी स्वरुपात तक्रारदाराने दिलेल्या पत्त्यावर पोच केली जाणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या तक्रार पुस्तिकेचा वापर करून आपल्या समस्या, गैरसोयी, हलगर्जीपणा आदींची नोंद करावी. जेणेकरून रुग्णालय व आरोग्य केंद्रांच्या सेवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा कृष्णा गुप्ता याने व्यक्त केली आहे.
पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रात तक्रार पुस्तिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 7:36 PM