उल्हासनगर - बेकायदा बांधकामाला पालिका आयुक्तांचा आशीर्वाद असल्याची तक्रार राज्य लोकायुक्तांकडे केल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. लोकायुक्तांनी लोकसेवकांच्या हुद्यासह त्यासंदर्भातील पुरावे तक्रारदाराकडे मागितल्याने पालिका कारभाराचे वाभाडे निघाले आहे.उल्हासनगर महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह नियुक्त केलेले प्रभाग अधिकारी बेकायदा बांधकामासह बांधकाम परवानगी देणे आदी प्रकारांना पाठीशी घालत असल्याची तक्रार अॅड. सतीश शहा यांनी राज्य लोकायुक्तांकडे ४ मार्च रोजी केली. लोकायुक्तांकडील तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. लोकायुक्त विभागाने तक्रारीची दखल घेत महापालिका लोकसेवक यांच्यावर मोघम आरोप न करता, लोकसेवकांचा हुद्दा व बेकायदा बांधकामाचा पुरावा २० मार्चपूर्वी प्रतिज्ञापत्र व पुराव्यानिधी सादर करण्यास सांगितले. शहा यांनी लोकायुक्तांकडे पुरावे सादर केल्यास आयुक्तांसह इतर अधिकारी वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, पालिका आयुक्त अच्युत हांगे बेकायदा बांधकामप्रकरणी किती बळी घेणार, असा प्रश्न मनसेचे मैन्नुद्दीन शेख यांनी विचारला आहे. एका वर्षात बेकायदा बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांना वीजवाहिन्यांचा धक्का बसून तिघांचा बळी गेला असून आयुक्त हांगे अशांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी अनेक पक्क्या बांधकामांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्य लोकायुक्तांकडे अॅड. शहा यांनी तक्रार केली असून त्यांना बेकायदा बांधकामांचे पुरावे लागत असतील, तर मी देण्यास तयार असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. तर, महापालिका अतिक्रमण विभगााचे प्रमुख गणेश शिंपी यांनी विनापरवाना शहरात काम होत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.नगररचनाकार विभाग कायमच राहिला चर्चेमध्येमहापालिकेचा नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वीच्या बहुतांश नगररचनाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. काही जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. संजीव करपे हे नगररचनाकार तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले आहेत. याबाबत, नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
बेकायदा बांधकामांची लोकायुक्तांकडे तक्रार, पालिका आयुक्त अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:21 AM