ठाणे : सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटकेतील २४ आरोपींविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयात ९०६ पानी दोषारोपपत्र दाखल केले. यात प्रश्नपत्रिका कशी फुटली, ती कुठून कोणाकडे कशी गेली, याबाबतचे सबळ पुरावे यामध्ये जोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह अन्य चार पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एकाच वेळी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापे टाकू न त्यावेळी २१ आणि नंतर तीन अशा २४ आरोपींना अटक केली. दरम्यान, ही प्रश्नपत्रिका आरोपींनी प्रथम सैन्य भरती कार्यालयातील संगणकाच्या हार्डडिस्कमधून चोरली. त्यानंतर ती व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून सोडवून घेण्यात आली. त्यानंतर सोडवलेल्या उत्तरपत्रिकेसह प्रश्नपत्रिका पुन्हा व्हॉट्सअॅपने विविध ठिकाणी पाठवली होती. याबाबत फॉरेन्सिक लॅबकडे पाठविलेल्या आरोपींच्या मोबाइलच्या तपासणीतून हा तपशील समोर आला आणि घटनाक्रम जुळवण्यात यश आले. तसा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
सैन्य भरती घोटाळ्यात दोषारोपपत्र
By admin | Published: May 01, 2017 4:41 AM