उल्हासनगर : शाळेची फी न भरल्याचे कारण देऊन ऑनलाइन वर्गाला न घेणे, शालेय शुल्कासाठी तगादा लावणे आदी तक्रारी काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय संघटनेकडे आल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर कारवाई न झाल्याने, संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे.
शहरातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत; मात्र कोरोना काळात अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. परिणामी, शाळेचे शुल्क नियमित भरले जात नाही. त्यामुळे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी मुलांना पुढील वर्गात प्रवेश टाळणे, ऑनलाइन वर्गापासून वंचित ठेवणे, शालेय शुल्कासाठी तगादा लावणे आदी तक्रारी काँग्रेसशी संलग्न एनएसयूआय संघटनेकडे आल्या. संघटनेने याबाबत चौकशी करून, दोषी शाळा संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी.एन. मोहिते यांच्याकडे केली; मात्र प्रशासन अधिकारी कारवाई करीत नसल्याने एनएसयूआय संघटनेने काँग्रेस शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्याकडे याबाबत निवेदन देऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. संघटनेचे शहराध्यक्ष रोहित ओव्हाळ, उपाध्यक्ष अमोल लोखंडे यांनी शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांच्याकडेही तक्रार केली; मात्र त्यानंतरही प्रशासन अधिकारी कारवाई करीत नसल्याने खंत व्यक्त केली. अखेर शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती ओव्हळ यांनी दिली आहे.