कल्याण - कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे.कल्याण-भिवंडीला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी बंद आहे. त्याला लागूनच समांतर खाडीपूल बांधला गेला. मात्र, तो वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने पुलावर प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या पुलाशेजारीच नवीन सहापदरी पूल उभारण्यास एमएमआरडीएने मंजुरी दिली. ७६ कोटी रुपयांचे हे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले. २५ मीटर रुंद आणि ३८ मीटर लांब असलेल्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबरला झाले. पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप गती मिळालेली नाही. पुलाचे केवळ दोन ते तीन खांब खाडीत उभारले गेले आहेत. पुलाचे काम सुरू झाले, तेव्हा मेरीटाइम बोर्डाने पुलाचे आधारखांब खाडीत उभारण्यासाठी परवानगीचा मुद्दा उपस्थित केला होता. या परवानगीनंतर सुप्रीम कंपनीने कामाला सुरुवात केली. मात्र, काम संथगतीने सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास पुलाच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागतील, अशी शक्यता आहे.पुलाच्या संथगतीबद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या कंपनीला एमएमआरडीएने भिवंडीतील अन्य दोन उड्डाणपुलांचे काम दिलेले आहे. तेही संथगतीने सुरू असल्याची तेथील लोकप्रतिनिधींची ओरड आहे.चौकातील कोंडी फोडापत्रीपूल ते दुर्गाडीदरम्यान गोविंदवाडी बायपास रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या मार्गाने येणारी वाहने दुर्गाडी चौकाला वळसा घालून खाडीपुलाकडे अथवा शहाड व कल्याण स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यामुळे दुर्गाडी चौकात कोंडी होती. ती टाळण्यासाठी बायपास रस्त्यावरून आलेली वाहने थेट कोनगावात जाण्यासाठी एक मार्ग तयार करावा.त्याचबरोबर स्टेशन ते दुर्गाडी असा एलिव्हेटेड मार्ग करावा. त्यामुळे कल्याण शिवाजी चौक आणि सहजानंद चौकातील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी पाटील यांनी मदान यांच्याकडे केली आहे.
दुर्गाडी पुलाचे काम कासवगतीने, एमएमआरडीएकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:21 AM