अंबरनाथ - जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाइलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला. मारहाण झालेले प्रवासी हे अंबरनाथला राहणारे आहेत. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सत्यजित बर्मन हे ५ एप्रिल रोजी हावडा येथून ‘गीतांजली’ने मुंबईला निघाले. ६ एप्रिल रोजी सकाळी गाडी बडनेरा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान असताना पँट्री कारचे कर्मचारी खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या जास्त दराने विकत असल्याचा आरोप करीत प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
काही वेळानंतर प्रवाशांना देण्यात आलेले जेवणही कमी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. याचा जाब विचारण्यासाठी सत्यजित हे प्रवाशांसह पँट्री कारमध्ये गेले. तिथे कर्मचाऱ्यांशी बोलत असतानाच त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. याचा राग आल्याने पँट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाइल खेचून घेत मारहाण केली. यादरम्यान इतर प्रवाशांनी आरपीएफच्या हेल्पलाइनवर याची माहिती दिल्याने अकोला रेल्वे स्थानकात जवानांनी सत्यजित यांची सुटका केली.
कर्मचाऱ्यांवर कारवाई करागाडी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर बर्मन यांनी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी पँट्री कारच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.