बदलापूर : बदलापूरमधील इंपेरियल ग्रूपमध्ये काम करणाऱ्या अमित श्रीवास्तव या तरुणाचा कंपनीने आठ महिन्यांचा पगार थकविला आहे. हा पगार मिळावा यासाठी अमित हा दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल पोलीस ठाणे, कामगार आयुक्त घेत नसल्याने या प्रकरणी त्याने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणी आपल्याला कोणीच न्याय देत नसल्याने जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरुच राहील अशी ठाम भूमिका या तरुणाने घेतली आहे.बदलापूरमध्ये इंपेरियल ग्रूप नावाने टी.एल.शुक्ला हे कंपनी चालवतात. या ग्रूपच्या माध्यमातून बिल्डरांना बुकींग देण्याचे काम केले जात होते. ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना बदलापूर आणि परिसरात घर दाखवून त्याचे बुकिंग करुन घेण्याचे काम केले जायचे. याच कंपनीत अमित हा दीड वर्षांपासून काम करत होता. सुरुवातीला पगार मिळण्यास विलंब होत होता. मात्र आठ महिन्यांपासून अमितकडून काम करुन घेतले जात होते. मात्र त्याचा मोबदला म्हणून पगार देण्यात येत नव्हता. मिळेल या आशेवर हा तरुण काम करत होता. मात्र आठ महिने उलटले तरी त्याला त्याचा हक्काचा पगार न मिळाल्याने त्याने कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे पगारासाठी तकादा लावला. पगाराच्या रकमेपैकी काही रक्कम धनादेशाद्वारे त्याने देत अमितचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेशा वटण्या आधीच शुक्ला यांनी तो धनादेश थांबविला. चेक न वटवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याने अमितला अर्धा पगारही मिळू शकला नाही. याबाबत त्याने जाब विचारला असता तुझ्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील अशा सूचना देण्यात आल्या. मात्र तरीही त्याचा पगार जमा झाला नाही. अखेर आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाद मागितली. तिथे त्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र न्याय मिळाला नाही किंवा शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर या प्रकरणी अमितने कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. या संदर्भात तक्रार दिल्यावरही शुक्ला यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. कायद्यानुसार तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने अमितने २६ जानेवारीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्याला आठ महिन्यांचा ४ लाख ५० हजार रुपये पगार आणि इतर सुविधा शुल्कांसह रक्कम येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने या पत्रात केली आहे. आता पंतप्रधानांकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी) कंपनीच्या मालकांशी संपर्कच नाही : दरम्यान, या प्रकरणी कंपनीचे मालक शुक्ला यांच्याकडे प्रतिक्रीया घेण्यासाठी गेले असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाही. मोेबाईलवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
पगारासाठी धडपड, न्याय न मिळाल्याने पंतप्रधानांकडे तक्रार
By admin | Published: February 01, 2017 3:17 AM