मीरारोड -
घोडबंदर मार्गावरील चेणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पासाठी इकोसेन्सेटिव्ह झोन असून देखील ९६ फळझाडांची तोड करण्यास भाजपासह आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला असून लेखी तक्रारी केल्या आहेत.
आमदार सरनाईकांच्या चेणे येथील सर्व्हे क्र . ९७ व ९८ मधील बांधकाम प्रकल्पासाठी त्याठिकाणी असलेल्या ९६ विविध फळांच्या झाडांची तोड करण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने सूचना प्रसिद्ध करून हरकती मागवल्या आहेत. त्या विरोधात आता भाजपा व आम आदमी पक्षाने तक्रारी करून झाडे तोडण्यास विरोध केला आहे. तश्या तक्रारी त्यांनी महापौर व महापालिका आयुक्त आदीं कडे केल्या आहेत.
सरनाईक यांच्या सदर भागातील प्रस्तावित प्रकल्पला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. सदर प्रकल्पा साठी महापालिका व शासनाने रस्त्याचे काम करून दिल्याचे आरोप व तक्रारी आहेत. त्यानंतर सदर ठिकाणी प्रकल्पमध्ये बाधा येणाऱ्या ९५ झाडांना तोडण्यासाठी पालिकेने हरकती सूचना मागवल्या वरून विरोध सुरु झाला आहे.
सदर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये असून देखील येथे मोठ्या प्रमाणात भराव झाडे नष्ट केली जात असल्याचा आरोप तक्रारदारांचा आहे. येथील ९६ झाडे सरनाईकांच्या फायद्यासाठी तोडून पर्यावरणाची मोठी हानी केली जात असल्याने झाडे तोडण्याची परवानगी देऊ नये तसेच सदर ठिकाणी आधीच झाडे तोडलेली असल्याने चौकशी करून कारवाईची मागणी भाजपा व आप च्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले की, झाडे तोडण्याची अजून परवानगी दिलेली नाही. हरकती- सूचना वर सुनावणी घेऊन कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल.
शहरात पर्यावरणाचे वाटोळे भाजपाचे नेते - नगरसेवक आदींनी केले असून भाजपाने पर्यावरणाची काळजी व्यक्त करणे म्हणजे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल. सरनाईक यांनी पर्यावरणाची हानी कधी केली नसून चेणे येथे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मोठ्या संख्येने नवीन झाडे लावली जाणार आहेत. - प्रवीण पाटील ( माजी विरोधी पक्षनेते)