ठाणे : ठाण्यात क्लस्टर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिकेने जनजागृती सुरूकेली असून शुक्रवारपासून ठरल्याप्रमाणे हाजुरी या पहिल्या भागाच्या लिडार सर्व्हेचे काम पूर्ण झाल्याचा दावा ठाणे महापालिकेने शुक्रवारी केला.सुरुवातीला येथील काही रहिवाशांनी या सर्व्हेला विरोध करून पोलीस ठाणे गाठले होते. परंतु, पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करून रहिवाशांचा गैरसमज दूर केल्यानंतर त्यांचा विरोध मावळल्याने हे काम करता आले. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हाजुरी येथे अशा प्रकारे सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी सकाळी सर्व्हेसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने सर्व्हेचे काम सुरू केल्यानंतर काही नागरिकांनी विरोध केला.सीमांकन झाल्याशिवाय हा सर्व्हे करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात येथील सर्व्हेला सुरुवात झाली. क्लस्टर योजनेसाठी मात्र ९० ते ९५ टक्के नागरिकांची संमती असून केवळ काही नागरिकांचा तिला विरोध असल्याने त्यांना वगळून हा सर्व्हे केला जाईल, असे पालिकेने आधीच स्पष्ट केले. या प्रकरणी पालिकेने नागरिकांची समजूत काढल्याने हे काम सोपे झाल्याचा दावा सहा. आयुक्त गायकवाड यांनी केला.चार टप्प्यांत होणार सर्व्हेक्लस्टरचा चार टप्प्यांत सर्व्हे करण्याचे सांगून महापालिकेने शुक्रवारी लिडार सर्व्हेचे काम हाती घेतले. त्यासाठी चारचाकी वाहनाच्या वरील बाजूस ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून हाजुरीसाठीची क्लस्टरची सीमारेषा निश्चित करण्यात आली.परंतु, हा सर्व्हे सुरू असतानाच रहिवाशांनी आधी गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करा, नंतरच तो करा, असे सांगून विरोध केला. परंतु, पालिकेने त्यांची समजूत काढल्याने हे काम पूर्ण झाल्याचा दावा सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांनी केला.
हाजुरीचा पहिल्या टप्प्यातील सर्व्हे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:03 AM