कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पुलाला ९० फुटी रस्त्याचा पाेहाेच रस्ता (अप्रोच रोड) आहे. या रस्त्याचे काम सहा वर्षांपासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूककोंडी सुटू शकते. अन्यथा, पत्रीपुलाचे काम पूर्ण करून काहीच उपयोग होणार नाही, याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शनिवारी लक्ष वेधले आहे.
९० फुटी रस्ता पत्रीपुलाला येऊन मिळतो, तेथील रस्त्याचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे सहा वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याबाबत नागरिक काशिनाथ गुरव यांनी राज्यपालांपर्यंत पाठपुरावा केला आहे. आज दुपारी एकीकडे पत्रीपुलाचा गर्डर सरकवण्याचे काम सुरू असताना आमदार पाटील यांनी अप्रोच रस्त्याची पाहणी करून महापालिका अभियंत्यास जाब विचारला. अभियंत्याला नीट उत्तरे देता न आल्याने पत्रीपुलाच्या दिशेने महापालिका आयुक्तांना आमदारांसह कार्यकर्ते निघाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत त्यांना पाेलिसांनी राेखून धरले. त्यावर आ. पाटील यांनी इथे बोलवा. अन्यथा, आम्हाला तेथे जाऊ द्या, असा आग्रह धरला. त्यानंतर आयुक्तांशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सोमवारी भेटण्याचे मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्रीपुलाप्रमाणे कोपरपूल, मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपूल, दुर्गाडीपूल, पलावापूल आणि आंबिवली येथील रेल्वेपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पुलाचे गर्डर सरकवण्यासाठी आदित्य ठाकरे येत असल्याचे व्यंगचित्र व्हायरल केले होते.