उल्हासनगर : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील भुयारी गटार व रस्त्याचे कामे पूर्ण करण्याच्या सूचना बोलविलेल्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांनी दिल्या आहेत. बैठकीला एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता, ठेकेदार, सल्लागार यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरात एमएमआरडीए मार्फत १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या दिड वर्षांपासून सुरू असून एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्त्याने नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. आयुक्त अजिज शेख यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी बोलविलेल्या बैठकीला एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अर्जुन कोरगांवकर, अरविंद धाबे, कार्यकारी अभियंता राजेंद्र देवरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक संचालक नगररचना ललित खोबरागडे, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, नोडल अधिकारी गणेश शिंपी, सहायक आयुक्त मनीष हिवरे, दत्तात्रेय जाधव, अनिल खतुरानी आदी अधिकारी तसेच रस्त्याचे व भुयारी गटार योजनेचे कंत्राटदार, प्रकल्प सल्लागार आदी जण उपस्थित होते.
एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या रस्त्यांचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करणेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी आदेश आयुक्तांनी बैठकीत अधिकारी, सल्लागार व ठेकेदाराला दिल्या आहेत. त्याच बरोबर भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. असा सल्लाही दिला आहे. भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीची मलवाहिनी टाकून झाल्यानंतर खोदलेला रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा. त्याशिवाय दुसरा रस्ता खोदु नये. रस्ता खोदण्यासाठी महापालिका बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेण्याचे आदेश आयुक्त शेख यांनी ठेकेदारासह सल्लागाराला दिला. शहरात भुयारी गटार योजना व रस्ते पुनर्बांधणीसाठी रस्ते खोदण्यात आल्याने, शहरात वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना शहर अभियंता संदीप जाधव यांना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत.
जलवाहिनी दुरुस्तीवरून रंगला सामना
भुयारी गटार योजने अंतर्गत व रस्त्याची पुनर्बांधणी वेळी रस्ते खोदल्याने, जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र फुटलेल्या व तुटलेल्या जलवाहिणीच्या दुरुस्तीवरून ठेकेदार व महापालिका आमनेसामने आले असून याप्रकाराने विकासकामे रखडण्याची शक्यता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख भारत गंगोत्री, विशाल माखिजा यांनी व्यक्त केली