सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला. रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम गेल्या एका वर्षांपासून अर्धवट असल्याने, नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. पुल रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या एका वर्षांपासून खोदून ठेवल्याने, वाहने, नागरिक, महिला, वृद्ध व शाळेतील मुले यांना जाण्यासाठी कसरत करावी लागते. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी रस्ताची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिकेला वारंवार केली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अजीज शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव वडोलगाव पुल रस्त्याबाबत आग्रही का नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला.
एका वर्षांपासून रस्ता पुनर्बांधणी होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर स्थानिक नागरिकांनी पुलाची बांधणी निवडणुकीपूर्वी न झाल्यास, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन महापालिकेला दिले. या घटनेने खळबळ उडून महापालिका कारभारावर टीका होत आहे. कॅम्प नं-५ जयजनता कॉलनी मध्ये १५ दिवसापूर्वी बांधलेला रस्ता निकृष्ट बांधल्याचे कारण पुढे करून पुन्हा खोदल्याने, महापालिका अजब-गजब कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर बुधवारी एका टोळक्याने कॅम्प नं-४ येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याबाबत ठेकेदारा सोबत वाद घालून ठेकेदाराला मारहाण केल्याची घटना घडली. दुसरीकडे रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत खोदलेले बहुतांश रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीच्या प्रमाणात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ता रुंदीकरणावरून वाद...
महापालिका शहर अभियंता संदीप जाधव शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुला जवळील रस्ता पुनर्बांधणीसाठी खोदण्यात येऊन रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. मात्र रुंदीकरणावरून स्थानिकांत वाद निर्माण झाल्याने, रस्त्याचे बांधकाम रखडले आहे. लवकरच रस्त्याची बांधणी करणार आहे.