भातसानगर : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर - चेरपोली दरम्यान रस्त्याच्या खचलेल्या भागाचे अखेर बांधकाम विभागाने काम केले. यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मुंबई - नाशिक महामार्ग क्रमांक ३ वरील चेरपोली - गोठेघर दरम्यानच्या पुलावरील मातीचा भराव खचल्याने पुलाची अवस्था दयनीय झाली होती. पुलावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना या खचलेल्या जागेचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती.
याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या नंतर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून तो ठराव तत्काळ मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या खचलेल्या जागी भराव घालून काँक्रीटीकरण करण्यात आले. तातडीने हे काम केल्याबद्दल नागरिक, वाहनचालक तसेच प्रवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. यामुळे या मार्गावरील ही अपघाताची भीती आता कमी झाली आहे.