ठाणे : नवी मुंबईत रहाणाऱ्या सुनंदा पाटील (६४) या महिलेच्या गळ्यावर थायरॉइडची गाठ तयार झाली होती. त्यापासून त्यांना फार त्रास हाेत असे. त्यावर मात करण्यासाठी लाखाे रूपयांचा खर्च खाजगी रुग्णालयात हाेणार हाेता. पण या महिलेने ठाणे सिव्हील रूग्णालयात उपचार सुरू केला. त्यामध्ये थायराॅईडच्या आजाराचे गांभीर्य ओळखून ठाणे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी तत्त्काळ निर्णय घेऊन या महिलेची थायरॉइडग्रंथीच्या गुंतागुंतीची दीड तासांची रविवारी यशस्वीरित्या पूर्ण केली, अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे यांनी दिली.
थायरॉइड ग्रंथी या एखाद्या बॅटरी प्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असल्या तरी त्यांची अकस्मात वाढ हाेणे धोक्याची घंटा असते. खाजगी रुग्णालयात थायरॉइड शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी, या ठाणे सिव्हील रुग्णालयात या महिलेच्या गळ्याखाली वाढलेल्या थायरॉइड ग्रंथींची गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. या आजार वाढीचे लक्षणे त्यावरील खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे सुनंदा यांच्या कुटुंबीयांनी सिव्हील रुग्णालयात उपचार घेण्याचे ठरवले. डॉ. कैलास पवार अणि डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेची थायरॉइडग्रंथी दीड तासांच्या कालावधीत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे.
थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. या ग्रंथीमधून काही संप्रेरके स्त्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवत असते. मात्र अतिरिक्त वाढलेल्या ग्रंथीचा त्रास सुनंदा यांना झाला होता. रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून थायरॉइडची गाठ काढून टाकली आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ सोनल चव्हाण आणि डॉ प्रतीक बिस्वास यांच्यासह ॲनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ प्रियंका महांगडे आणि डॉ रूपाली यादव आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिक्रीया -
थायरॉइडच्या लक्षणांमध्ये वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, महिलांच्या पाळीमध्ये बदल होणे, केस गळणे, श्वास घेण्यासाठी त्रास, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे अशी काही लक्षणे असतात. या महिलेच्या या आजाराचे निदान करून त्यावर आज यशस्वी शस्त्रक्रीया सिव्हील रूग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांच्या पथकाने केली आहे.- डॉ. कैलास पवार
जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हील रूग्णालय, ठाणे)