भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शाळांत देण्यात येणारे संगणक शिक्षण तीन वर्षांपासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हे शिक्षण त्वरित सुरू करण्यासाठी पालिकेचे निवृत्त अधिकारी अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापौर डिम्पल मेहता यांना निवेदन दिले. तसेच आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही वृत्ताची दखल घेत आपल्या दालनात बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात पालिका शाळेमध्ये लवकरच संगणक शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालिकेने त्यावेळच्या ३५ शाळांत प्रशासनाने २००६ मध्ये संगणक शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी १० वर्षांचे कंत्राट पॅम्सी टेक्नॉलॉजी या कंपनीला दिले होते. २०१६ मध्ये कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर पालिकेने कंपनीच्या शिक्षणपद्धतीवर अंकुश ठेवून त्यांना मुदतवाढ दिली नाही. यामुळे तीन वर्षांपासून संगणक शिक्षणाला ब्रेक लागल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत ज्येष्ठ नागरिक उमेश म्हात्रे, श्रीकांत मोरे, पालिकेचे निवृत्त अधिकारी संजय गोखले यांनी महापौरांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे बंद पडलेले संगणक शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे निवेदन महापौरांना दिले.दरम्यान, आयुक्तांनीही बुधवारी बैठक घेतली. आयुक्तांनी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे बंद पडलेले संगणक शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी मेसर्स डॅनियश इन्फोटेक या कंपनीची कंत्राटावर नियुक्ती केल्याचे सांगितले. कंपनीला कार्यादेश दिल्यानंतर लवकरच संगणक शिक्षणाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिली. पालिका शाळांत अद्यापही विज्ञान प्रयोगशाळेची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात असल्याकडे ज्येष्ठ नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. आयुक्तांनी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून पालिका शाळांत नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या अधिकाºयांना दिले. बैठकीस शिक्षण समितीचे उपायुक्त दीपक पुजारी, नगररचना विभागाचे हेमंत ठाकूर, विधी अधिकारी सई वडके, मुख्याध्यापक उपस्थित होते.