भार्इंदर: राज्य सरकारने प्लास्टिक पिशव्या, ग्लास, चमचे आदींसह थर्माकोल वापरावर बंदी लागू केल्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे कसे साकारायचे, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. त्यावर कागदी, कापडी व लाकडी देखाव्यांचा पर्याय चित्रकार शेखर भोईर यांनी गणेशभक्तांना उपलब्ध करून दिला आहे. भक्तांनी अधिकाधिक नैसर्गिक वस्तूंमधूनच देखावे साकारावे, असे आवाहन केले आहे.नायगाव येथील पाणजू बेटावर राहणारे शेखर यांचे मामा विद्याधर भोईर यांचा भार्इंदर पूर्वेकडील नवघर येथे गणेशमूर्तींचा कारखाना आहे. दरवर्षी शेखर कारखान्यात येतात. मूर्ती घडवण्यासह विविध देखावे साकारण्याचा छंद त्यांना असल्याने ते नेहमी वैविध्य तसेच नावीन्यपूर्ण देखाव्यांची संकल्पना साकारत असतात.सरकारने प्लास्टिक व थर्माकोल वापरावर बंदी लागू केली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विशेषत: थर्माकोलखेरीज देखावे साकारण्यावर गणेशभक्तांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यावर, शेखर यांनी आपल्यातील कलागुणांचा वापर करत कागदी, लाकडी व कापडांचा वापर करून नावीण्यपूर्ण देखावे साकारण्याची संकल्पना मांडली आहे. या साहित्यांचा त्यांनी विविध कलाविष्काराने वापर करत देखावे साकारण्यास सुरुवात केल्याने थर्माकोल व प्लास्टिक साहित्यांच्या वापराखेरीज नवीन देखावे नैसर्गिकरीत्या अधिक आकर्षक ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.या देखाव्यांसाठी ते कागदाचे टी ग्लास, पाणी पिण्याचे ग्लास, द्रोण, पुठ्ठा, तागाची सुतळी, कापडी गोंडे, लेस, विविध फुले व त्यांची तयार वेल, सुपारी, राजमा हे कडधान्य, लाकडाचा भुस्सा, मोल्डिंग खांब, प्लायवूड, एलईडी बल्ब, इमिटेशन ज्वेलरी, अॅल्युमिनिअमच्या पट्ट्या आदी साहित्यांचा वापर केला आहे. हे देखावे घरगुती गणेशोत्सवासाठी साकारण्यासाठी कमीतकमी ७०० ते ८०० रुपयांचा खर्च येतो. पुढे देखाव्याच्या आकारमानानुसार देखाव्याचा खर्च वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.या देखाव्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांनुसार देखावे किमान दोन फूट उंच, तर तीन फूट लांबी-रुंदीपर्यंत साकारता येत असल्याचे शेखर यांनी सांगितले. त्यातच, हे देखावे टिकाऊ असल्याने गणेशोत्सवानंतर त्याचे भाग वेगळे करून ते जपून ठेवणे शक्य होते. याउलट, थर्माकोलच्या देखाव्यांचे भाग जपून ठेवणे कठीण जाते.प्रदूषणाचा त्रास नाहीदेखाव्यांसाठी लाकडी, कागदी व कापडी या साहित्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने ते वर्षानुवर्षे टिकत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा साहित्यामुळे प्रदूषण न होता त्यांचा पुनर्वापर शक्य होत असल्याने भक्तांनी असे देखावे साकारावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी कागद, कापडाचा वापर , चित्रकार शेखर भोईर यांची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 3:03 AM