मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका मार्गावर पेव्हर ब्लॉक न काढताच त्यावर सिमेंट-काँक्रीट टाकून रस्ता बनवण्याचा प्रताप मीरा भाईंदर महापालिकेने चालवला आहे. भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरील कृष्ण नीला व भरत स्मृती इमारतीच्या मधून मागील औद्योगिक वसाहत मार्गे खारीगाव मार्केट पर्यंतचा जुना लहानसा रस्ता आहे.
दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पालिकेने केले होते. आता त्या पेव्हर ब्लॉकवरच सिमेंट काँक्रीट टाकून सिमेंटचा रस्ता बनवण्याचे काम महापालिकेने सुरू केले. आधीच येथील इमारती, गाळे पूर्वीपासूनचे असल्याने रस्त्याच्या पातळी पासून खाली गेले आहेत. त्यामुळे पेव्हर ब्लॉक न काढताच त्यावर सिमेंट काँक्रिटचा थर टाकून रस्त्याचे काम पालिकेने सुरू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
अशा कामामुळे आजूबाजुच्या इमारती, गाळ्यात जास्त पाणी शिरेल अशी भीती लोकांनी बोलून दाखवली. तर पेव्हर ब्लॉक न काढताच त्यावर काँक्रीट रस्ता बनवण्याचा भोंगळपणा ठेकेदाराच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप करत कामाची ही पद्धत पालिकेच्या कुठल्या तंत्रज्ञानात बसते? २ वर्षांपूर्वीच पेव्हर ब्लॉक लावले होते तर पुन्हा कामाचे कंत्राट कोणासाठी काढले गेले? असे सवाल नागरिकांनी केला आहे.
नियोजनशून्य, निकृष्ट आणि मनमानी कामामुळे पैसा वाया जात आहेच. शिवाय नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील रहिवाशी प्रसाद परब यांनी बोलून दाखवले. या प्रकरणी शहर अभियंता दीपक खांबित यांच्याशी महापालिकेच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी कॉल उचलला नाही.