बदलापूर : बदलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या चार महत्वाच्या रस्त्यांसाठी एमएमआरडीएतर्फे निविदा मागवल्या आहेत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला समांतर असलेल्या बेलवली- मांजर्ली, वालिवली ते बदलापूर गाव, भगवती रूग्णालय ते बदलापूर गाव अशा महत्वाच्या रस्त्यांचा यात समावेश आहे. यासाठी 29 कोटींच्या निविदा जाहीर झाल्या आहेत.बदलापूर शहरात काही वर्षात रस्ते रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील बाजारपेठ रस्त्यावर होणारी कोंडी फोडण्यासाठी त्याला पर्यायी असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण करून काँक्रिटीकरणाची मागणी होत होती. बदलापूर पश्चिमेतील बेलवली येथील जीवन प्राधिकरणाचे कार्यालय ते गणेश चौक, मांजर्ली - हेंद्रेपाडा, मानवपार्क - चर्च रस्ता हा पुढे बदलापूर गावाला मिळणारा बदलापूर स्थानकाबाहेरील बाजारपेठेच्या रस्त्याला पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे शहराच्या स्थानक परिसरातून होणारी वाहतूक बाहेरूनच वळवणे सोपे होणार होते.या रस्त्याच्या उभारणीसाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान योजनेत समावेश करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न केले होते. मात्र ते प्रयत्न यशस्वी न झाल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले होते. अखेर या महत्वाच्या रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या निधीतून निविदा मागवण्यात आल्या आहेत.वालिवली ते बदलापूर गाव या रस्त्यासाठी मिळून ९ कोटी २२ लाख ८७ हजारांची निविदा जाहीर केली आहे. यासह बदलापूर गावातील आगर आळी, शिवाजी चौक या रस्त्यासाठी ५ कोटी ३४ लाख, बदलापूर पूर्वेतील शिरगाव येथील आसाराम बापू आश्रम ते पारसी बंगला- मॅरेथॉन नगरी- आर्यन वन हाऊसिंग सोसायटी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ७ कोटी ४९ लाखांची निविदा जाहीर झाली आहे.बदलापूर पश्चिमेतील स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा असला तरी त्यापुढचा बदलापूर नदीवरील पुलापर्यंतचा रस्ता डांबरी आहे.दरवर्षी या रस्त्यावर पावसाळ््यात खड्डे पडतात. त्यात गणेशोत्सवात विसर्जनासाठी नदीवर जाणाऱ्या गणेश भक्तांना आणि बदलापूर गावात जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.बदलापूरमधील रस्ते डांबरमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभरात शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल. लहान रस्त्यांचेही प्रस्ताव तयार केले आहेत.- किसन कथोरे, आमदार
बदलापूरचे रस्ते होणार काँक्रिटचे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:00 AM