ठाणे : वडिलांकडून घरासाठी एक कोटीची रक्कम दिल्यानंतरही ठाण्यातील घोडबंदर रोड येथील एका विवाहितेचा छळ करणा-या नरेंद्र सोनी (पती), लीलादेवी (सासू), गणपतलाल (सासरे) आणि वर्षा सोनी (नणंद) या सासरच्या मंडळींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मुंबईतील एका नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर असलेल्या नरेंद्र सोनी यांच्याबरोबर १२ डिसेंबर २०१४ रोजी प्रिया यांचा विवाह झाला. लग्रानंतर त्यांचा दीर आणि जाऊ राजस्थानला गेले. वाघबिळ येथील ‘रोजाबेला’ या इमारतीमध्ये भाडेतत्वावरील घरामध्ये नरेंद्र आणि प्रिया हे नवदाम्पत्य वास्तव्य करीत होते. सुरुवातीला काही दिवस बरे गेले. त्यांनतर तिला जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत पतीसह सासरच्या मंडळींनी संगनमताने शारीरिक मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. ‘माहेरून पैसे आण नाहीतर घर सोडून निघून जा’, अशी धमकी देत तिला मारहाण आणि शिवीगाळही करण्यात आली. याच मारहाणीची तिने २०१५ मध्येही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी त्यावेळी समजूत घालून त्याला ताकीदही दिली होती. काही दिवस प्रकरण मिटले. पुढे पुन्हा त्याने तिच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. आपल्या आईवडिलांना सरप्राईज द्यायचे आहे, असे सांगून मानपाड्यातील दोस्ती इम्पेरिया इथे घर घेण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. तिने वडिलांकडून एक कोटींची रक्कमही आणली. तरीही तिचा त्यांनी छळ सुरूच ठेवला. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून तिने याप्रकरणी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी चितळसर पोलीस ठाण्यात हुंडयासाठी छळ करणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. हा प्रकार रोजाबेला, वाघबिळ नाका येथे घडलेला असल्यामुळे हे प्रकरण आता कासारवडवली पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी सांगितले.
घरासाठी एक कोटी घेऊनही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ: ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 9:13 PM
केवळ आपल्या आई वडीलांना सरप्राईज द्यायचे असल्याचे सांगून घरासाठी पत्नीच्या माहेरुन एक कोटींची रक्कम घेऊनही तिचा छळ करणा-या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देपतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रारशारिरीक मानसिक छळपैसे आणले नाहीतर घर सोडण्याचीही धमकी