कोरोनाचा सामना करणाऱ्या यंत्रणेच्या सावळ्या गोंधळामुळे रुग्णांचे हाल सुरुच आहेत. घोडबंदरच्या एका रुग्णाचा अहवाल नजरचुकीने पॉझिटिव्ह आला आणि त्याला नाहक सात दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दुसरीकडे, जिल्हा शासकीय रुग्णालयाने क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवलेल्या रुग्णांसाठी तिथे जागाच नसल्याने रुग्णांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. याशिवाय, पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन न केल्याचे, तर रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांच्या नातेवाइकांना गरज नसताना क्वारंटाइन करण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. घोडबंदर भागातील आझादनगर येथील रुग्णाने कळवा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला सात दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह होता, असा साक्षात्कार रुग्णालयाला तब्बल सात दिवसांनंतर झाला. रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून चूक झाल्याचे सांगत रुग्णाला घरी नेण्यास सांगितले.काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयाच्या चुकीमुळे एका नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला मुंबईपर्यंत फरफट करावी लागली होती. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचे हाल झाले होते. ही घटना ताजी असतानाच रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. घोडबंदर भागातील आझादनगर भागात राहणाºया ५0 वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने त्याला मानपाडा आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार, त्याने कळवा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णालयाने सांगितले. त्यानुसार, तत्काळ त्याला कळवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो ज्या भागात राहत होता, तो भागही सील करण्यात आला. त्याच्या मुलाला आणि पत्नीला घरीच क्वारंटाइन करण्याचा सल्लाही पालिकेने दिला होता.दरम्यान, सात दिवसांनंतर, गुरुवारी सकाळी रुग्णाच्या मुलाला रुग्णालयाच्या वतीने फोन करून, तुमच्या वडिलांना घरी घेऊन जा, असे सांगण्यात आले. वडील बरे झाले का, असा सवाल त्याने केला असता, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होता, असे सांगून आधीचा रिपोर्ट हा चुकीने देण्यात आला होता, असेही सांगण्यात आले. त्यानुसार, रुग्णाचा मुलगा कळवा रुग्णालयात गेला असता, तेथील प्रशासनाने तीच बाब त्याला सांगितली. परंतु, वडिलांची पुन्हा चाचणी करा, अशी विनंती त्याने केली. तुमच्या वडिलांची प्रकृती बरी असल्याने त्यांना घरी घेऊन जा किंवा महापालिकेच्या भार्इंदर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जा, असा सल्लाही रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यामुळे रुग्णाला तेथून भार्इंदरपाडा येथे हलवण्यात आले आहे. कळवा रुग्णालयाकडून झालेली आणखी एक चूक एखाद्याला किती महागात पडते, याचे उदाहरण यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.रुग्णालयाच्या एका चुकीमुळे आमचा परिसर सील करण्यात आला आहे. अहवाल निगेटिव्ह होता, तर तो सात दिवसांनंतर रुग्णालयाला कसा उमगला? या चुकीमुळे रुग्णाचे आणि आमच्या कुटुंबाचेही हाल झाले आहेत. - रुग्णाचे नातेवाईक
CoronaVirus News: यंत्रणेच्या गोंधळामुळे कोरोना रुग्णांचे हाल; आणखी एका रुग्णाला चुकीच्या अहवालाचा मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:10 AM