लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘ ई पोर्टल’ च्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या मंगळवारच्या एक दिवसीय देशव्यापी बंदला ठाण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात इमर्जन्सी काऊंटर्सची माहिती न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना देण्यात आले.आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्याच्या मुख्य मागणीसाठी हा बंद पुकारलेला होता. कोणत्याही फार्मासिस्ट शिवाय किरकोळ औषध विक्रेता हा मेडीकल चालवू शकत नाही, असा भारतीय कायदा आहे. तसेच डॉक्टरांच्या अधिकृत पत्राशिवाय झोपेच्या, अॅन्टीबायटीक, खोकल्यावरील अल्फ्राझोलम, कोरेक्स सारखी गुंगीकारक औषधेही आॅनलाईन मिळाल्यामुळे त्याचा मोठा दुष्परिणाम होणार आहे. यालाच विरोध करण्यासाठी २९ मे च्या मध्यरात्री ते ३० मे च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मेडीकल विक्रेत्यांनी हा बंद पाळला. गंभीर रुगणांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयातील मेडीकल स्टोअर्स यातून वगळण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाभर सुमारे २०० इमर्जन्सी मेडीकल काऊंटर्स सुरु ठेवलेली होती, अशी माहिती ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव विजय सुराणा यांनी दिली. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, कोपरी या प्रत्येक विभागात प्रत्येकी दोन अशी २० ते २५ दुकाने तातडीच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेली होती. या देशव्यापी संपामध्ये ठाणे शहरातील ६००, कल्याणमधील ४०० अशी जिह्यातील पाच हजार औषध विक्रेत्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविल्याचा दावा असोसिऐशनने केला आहे.अत्यावश्यक सेवा उपलब्ध केल्यामुळे अतितत्काळ प्रसंगी रुग्णांना औषधे देण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सांगितले.अन्यथा बेमुदत संपकेंद्र सरकारने ‘ई पोर्टल’ बाबतच्या भूमिकेत बदल न केल्यास भविष्यात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार तीव्र आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी बेमुदत संपही केला जाऊ शकतो, असा इशाराही देशमुख यांनी दिला. या औषध विक्रेत्यांच्या भूमिकेचे निवेदन मंगळवारी दुपारी संघटनेचे देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी गलांडे यांना दिले.
औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल
By admin | Published: May 31, 2017 5:49 AM