टिटवाळा : भारत देशाचा ७३ वा स्वतंत्र दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच धर्तीवर कल्याण तालुक्याच्या टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, महापालिका व खाजगी शाळा, कॉलेज मध्ये ध्वजारोहण करत स्वंतत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. खडवली येथील भारतीय सैनिकी शाळेतील मुलांची परेड पाहून उपस्थितांना भारतीय जवानांची परेडची आठवण करून दिली.
स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत फळेगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी काळी 7 वा. गावांतून प्रभात फेरी काढली. दरम्यान संपूर्ण गावात भारत माता की, जय जवान जय किसान या घोषणाचा नाद दुमदुमत होता. सकाळी 8 वा. ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत गात व देशभक्तांवर भाषणे सादर केली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती वैशाली चंदे व मीनाक्षी फाउंडेशन यांच्याकडून या शाळेतील विद्यार्थ्यांना 500 वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच फळेगांवातील ग्रामस्थ दिनेश आगिवले यांनी शाळेला 5 फंखे भेट दिले.
स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रम खडवली येथील भारतीय सैनिकी शाळेतील देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रथम विर जवानांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहून नंतर ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा ध्वजाला सलामी दिल्यानंतर या सैनिकी शाळेतील मुलांची वेगवेगळ्या प्रकारच्या परेड घेण्यात आल्या. ही परेड पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या मुलांची परेड पाहून उपस्थितांना भारतीय सैनिकांची लाल किल्ल्यावरील परेडची अनुभूती अनुभवायास मिळाली. त्यांची ही परेड पाहून हे भावी भारतीय सेनानी आहेत असे उद्गार यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्य रमेश बांगर यांनी काढले.
भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत टिटवाळा येथील अंकुर बालविकास केंद्रातील 14 मुलं व 6 मुली या 20 अनाथ मुलांसोबत जेवणाचा व रक्षाबंधनाचा कार्यक्रम येथील सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे व मित्र परीवारा कडून करण्यात आला. हे सर्व काही पाहून या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. तसेच या प्रसंगी ऐगडे यांनी येथील निवृत्त भारतीय सेनानी सतिष कुमार यांचा सन्मान व सत्कार करत त्यांना भेट वस्तू देखील दिल्या.
टिटवाळा येथील मराठा हाईटच्या रहिवाशांकडून स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत येथील घर-अंगण येथील साईकृपा चाळीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत धान्य, खाऊ, जीवनावश्यक वस्तू, कपड्यांचे वाटप करण्यात आले.