ठाणे : राज्य परिवहनसेवेच्या बसमध्ये वाहकाच्या जागेवर बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून जोतिबा दराडे (२८) या वाहकाला जबर मारहाण करणा-या राज आणि सई गांधी या दाम्पत्यापैकी राजला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नालासोपारा ते श्रीवर्धन जाणा-या एसटीमध्ये राज आणि सई हे दाम्पत्य त्यांचे वडील प्रशांत गांधी (रा. घाटकोपर, मुंबई) यांच्यासोबत २६ डिसेंबर रोजी सकाळी ६.४५ वा. च्या सुमारास बसले. वडील अपंग असल्यामुळे त्यांना वाहकाच्या जागेवरच बसवा, इतरत्र बसवू नका, असा आग्रह या दाम्पत्याने धरला. त्यांना वाहकाच्या सीटऐवजी वाहकाच्या मागील सीटवर बसवा, असे वाहक दराडे यांनी सुचवले. यातूनच त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीतून राज आणि त्यांची पत्नी सई यांनी एकदम आक्रमक पवित्रा घेऊन दराडे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दराडे यांना मारहाण करून त्यांच्या शासकीय कामातही अडथळा निर्माण केला. तसेच त्यांना ठार मारण्याचीही त्यांनी धमकी दिली. या सर्व धुमश्चक्रीत ही बस बराच वेळ खोपट स्थानकात उभी होती. नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राज गांधी याला अटक केली. दरम्यान, प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, म्हणून खोपट स्थानकातून दुसरी बस तसेच अन्य वाहक आणि चालक यांच्यासह श्रीवर्धनसाठी सोडण्यात आल्याची माहिती ठाण्याचे आगार व्यवस्थापक रमेश यादव यांनी दिली.
बसमध्ये ठरावीक जागा न मिळाल्याने ठाण्यात एसटीच्या वाहकाला मारहाण : एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 8:34 PM
वाहकाच्या जागेवर बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून जोतिबा दराडे (२८) या वाहकालाच जबर मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ठाण्याच्या खोपट बस स्थानकात घडली. प्रवाशांचा खोळंबा होऊ श्रीवर्धनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरी बस सोडण्यात आली.
ठळक मुद्देखोपट स्थानकातील घटना नौपाडा पोलिसांनी केली कारवाईप्रवाशांचा मात्र खोळंबा