ठाणे : गेले १५ दिवस सुरू असलेल्या विविध पक्षांच्या प्रचारानंतर आता मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्यासाठी बुथस्तरावरील संघटना सक्रिय करणे, चाणाक्ष पोलिंग एजंट नियुक्त करणे, अशा सर्व यंत्रणा सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या वतीने यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक बुथकरिता एका व्यक्तीवर जबाबदारी सोपवली असून त्याच्या हाताखाली कार्यकर्ते दिमतीला दिले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदाराला बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेने पहाटेपर्यंत ठाण्यातील एका अज्ञातस्थळी विविध पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे आमदार, खासदार आदींसह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात मतदारयादीतील घोळाबरोबरच कोण कुठे ताकदवान आहे आणि कोण कुठे कमकुवत आहे, याची चाचपणी करण्यात आली आहे. त्यानुसार, एखादा उमेदवार कमजोर असेल, तर त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, येथील अधिकाधिक मतदारांना बाहेर कसे काढता येईल, यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. पोलिंग एजंटपासून बुथ एजंटपर्यंतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सुमारे दोन हजारांहून अधिकचे एजंट नेमण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे भाजपानेदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच विधानसभेत कोणत्या भागातून भाजपाला अधिकची मते मिळाली, त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. तसेच मतदाराला बाहेर काढण्यासाठी बुथ आणि इतर पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली आहे. ज्या भागात भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या ठिकाणचे मतदान कसे वाढवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रचार संपल्यापासून गुप्त बैठकांवर अधिक प्रमाणात जोर देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ण आमचे १४५० पोलींग एजंट तयार आहेत आणि मतदान केंद्रांच्या बाहेर मनसेचे ३५० बुथ लागतील असे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. कार्यकर्ते सकाळी स्वत: मतदान करतील आणि त्यानंतर सकाळीच मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करतील.
बुथस्तर यंत्रणेवर पक्षांची भिस्त
By admin | Published: February 21, 2017 5:44 AM