सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पंधरा जखमी झाले आहेत. कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल साठा आहे याची माहिती स्थानिक अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात असल्याने आग विझविताना अडचणी निर्माण होत आहेत.सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा म्हणून टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) एमआयडीसी क्षेत्राची ओळख आहे. या औद्योगिक क्षेत्रात साडेचार हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योगधंदे आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर होत असून, अति ज्वलनशील रसायनांचाही समावेश आहे. अनेकदा अशा ठिकाणी सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याने आगीच्या दुर्घटना घडतात. त्यानुसार टीटीसी औद्योगिक क्षेत्रात गतवर्षात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी रबाळे झोनमध्ये ७४ तर नेरूळ झोनमध्ये ७० घटनांचा समावेश आहे. त्यात आगीच्या सहा दुर्घटना या गंभीर स्वरूपाच्या होत्या. या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.गेल्यावर्षी सर्वाधिक आगीच्या घटना जून व ऑगस्ट महिन्यात घडल्या आहेत. रबाळे झोनमध्ये जून महिन्यात १७ ठिकाणी आग लागली होती. तर नेरूळ झोनमध्ये ऑगस्टमध्ये १७ ठिकाणी आग लागली होती.
उघड्यावर केला जातो रसायनाचा साठाnएमआयडीसी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांमध्ये नियमांची पायमल्ली करून धोकादायक वस्तूंचा साठा करून ठेवला जात आहे. काही ठिकाणी कंपनीलगतच्या मोकळ्या जागेतच गोडाऊन बनवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी उघड्यावरच रसायनाचा साठा केला जात आहे. तर बंद पडलेल्या कंपन्यांच्या ठिकाणी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत. nयामुळे एखादी छोटीशी आग आजूबाजूच्या कंपन्यांपर्यंत पसरून मोठ्या दुर्घटना घडत आहेत. अशातच नियमांच्या आडून कंपन्यांमध्ये वापर होत असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या नियोजनात अडथळे येत आहेत.
एमआयडीसीच्या दोन्ही अग्निशमन केंद्रांना वर्षभरात आगीचे १५१ कॉल आले होते. त्यापैकी १४४ कॉल हे एमआयडीसी तर ७ क्षेत्राबाहेरील होते. आगीच्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले.- आर.बी. पाटील, अग्निशमन केंद्र अधिकारी, एमआयडीसी