कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दुकानदारांना काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवार सम-विषम (पी-१ आणि पी-२) यानुसार दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, याबाबत दुकानदारांसह अधिकारी वर्गात संभ्रमावस्था असल्याचे चित्र सकाळी दिसून आले.
सोमवार ते शुक्रवार दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवायची आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मात्र, काही दुकानदार सात वाजून गेले तरी दुकाने बंद करत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनासह पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शनिवारी आणि रविवारी पी-१ आणि पी-२ नुसार दुकाने बंद ठेवायची आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी कोणत्या बाजूची दुकाने शनिवारी खुली राहणार आणि कोणत्या बाजूची दुकाने बंद राहणार याविषयीच नीट माहिती महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी दुकानदारांना दिलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी ज्या बाजूची दुकाने बंद करायची होती. त्याच बाजूच्या दुकानदारांनी दुकाने उघडली होती. अखेरीस महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी गाडी फिरवून शनिवारी नेमक्या कोणत्या बाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवायची आहे, याची माहिती दिल्यावर दुकानदारांनी दुकाने बंद केली. दुपारच्या सत्रात एका बाजूची सगळीच दुकाने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.
खरेदी सुरू असताना दुकाने कशी बंद करायची?
अन्य दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र, ७ वाजतादरम्यान दुकानात एखादी महिला ग्राहक खरेदी करीत असल्यास दुकानदाराला लगेच शटरडाऊन करता येत नाही. खरेदी पूर्ण झाल्यावरच दुकान बंद करता येऊ शकते. मात्र, दुकानात महिला असताना अधिकारी व पोलिसांकडून सक्ती केली जात असल्याची तक्रार काही दुकानदारांनी व्यक्त केली आहे. हॉटेल आणि बार यांना जास्तीची वेळ दिली गेली आहे. बार तर रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
फोटो-कल्याण-दुकाने बंद.
----------------------