- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्थानिक शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांत महायुती व शहर विकासाबाबतच्या गेल्या आठवड्यात बैठक झाली. महायुती बाबतच्या बैठकीचे कोणतेही आदेश पक्षाचे नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री व प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांनी देऊन महायुतीवर प्रश्नचिन्हे उभे केले.
उल्हासनगर महापालिका सत्तेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष एकत्र असून येणाऱ्या महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची युती कायम राहण्यासाठी गेल्या आठवड्यात स्थानिक नेत्यांची बैठक झाली. बैठकीत महायुती व विकास कामा बाबत चर्चा झाली असून निवडणुकीत महायुती कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली. बैठकीला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या शहाराध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, कमलेश निकम आदी जण उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री, प्रदेश सरचिटणीस व माजी जिल्हाध्यक्षा सोनिया धामी, माजी नगरसेवक सतीश चहाळ यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन, महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची महायुती झाली नाही. अशी माहिती त्यांनी वरिष्ठ नेत्यांसी चर्चा करून दिल्याचे म्हटले.
महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाच्या महायुतीची अधिकृत घोषणा अथवा तशी माहिती पक्षाने आम्हाला दिली नाही. तसेच स्थानिक नेत्यांनीही याबाबत कल्पना दिली नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत गंगोत्री व सोनिया धामी यांनी दिली. याप्रकाराने शिवसेना- राष्ट्रवादीच्या महायुतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी यांनी वरिष्ठ नेत्याच्या संमतीने स्थानिक शिवसेना नेत्या सोबत निवडणूक पाश्वभूमीवर व शहर विकास कामावर चर्चा केल्याची माहिती दिली. गंगोत्री यांना याबाबत कल्पना नसावी. असे मतही पंचम कलानी यांनी व्यक्त केले. ऐकूनच राष्ट्रवादी पक्षातील वाद महापालिका निवडणूक दरम्यान उफाळून आल्यास पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जाते.
गंगोत्री गट ठरणार डोकेदुखी?शहरात गेल्या पाच वर्षात कलानी कुटुंबा शिवाय राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी भारत गंगोत्री यांच्या टीमने प्रयत्न केले. मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची सत्ता येण्यासाठी, पक्ष नेतृत्वाने कलानी कुटूंबाला पुन्हा पक्षात प्रवेश देऊन पंचम कलानी यांच्या गळ्यात पक्षाचे शहाराध्यक्ष पद पंचम कलानी यांच्या गळ्यात टाकले. मात्र दुसरीकडे मन दुखविलेल्या भारत गंगोत्री टीमची नाराजी पक्षाला डोकेदुखी बनणार असल्याची शक्यता व्यक्त केली.