कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली असून त्या जागेचा ताबा घेणे सुरू आहे. त्याठिकाणी असलेली अधिकारी वर्गाचे घरे पाडण्यावर स्थगिती नाही. मात्र कामगारांची घरे आणि अधिकारी वर्गाची घरे जवळ जवळ असल्याने नोटिसा बजावताना कामगार वर्गात संभ्रम निर्माण होऊन गुरुवारची दगडफेकीची घटना घडली, असे स्पष्टीकरण अदानी समूहाच्या प्रवक्त्याकडून देण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींविरोधात कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार अदानी उद्योग समूहाकडून कारवाई सुरू आहे. कामगार त्यांच्या घरासंदर्भात न्यायालयात गेले आहेत. त्यावर स्थगिती आदेश आहे. मात्र अधिकारी वर्गासाठी असलेली घरे पाडू नयेत, असा कोणताही आदेश नाही. २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेने राष्ट्रीय कंपनी लवादाकडे दिवाळखोरींतर्गत एनआरसी कंपनीच्या विरोधात अर्ज केला. कंपनी लिलावात काढली. अदानीने कंपनी लिलावात घेतली. लवादाने दिलेल्या आदेशानुसार सप्टेंबर २०२० पासून कंपनीत अदानींचे व्यवस्थापन काम पाहत आहे. मान्यताप्राप्त कामगार युनियनसोबत झालेल्या करानुसार, अदानींनी लवादाकडे कामगारांच्या थकबाकीची रक्कम भरली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या धनादेशाचे वाटप सुरू आहे, असे अदानींच्या प्रवक्त्याने सांगितले.
---------------------