लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी रंगत वाढत आहे. पिंपळास ग्रामपंचायतही सध्या वेगळ्या कारणाने गाजत आहे. दोन महिला उमेदवारांच्या पतीच्या नावातील साम्याने सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे.
येथे राहणाऱ्या म्हस्के कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन महिला उमेदवारांच्या पतीचे नाव, आडनाव यात साम्य असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या असल्याचे समाेर आल्यावर या चर्चेवर पडदा पडला आहे. पिंपळास ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४ ड मध्ये शिवसेना पुरस्कृत अग्निमाता पॅनलच्या सुजाता कल्पेश म्हस्के आणि कोमल कल्पेश मस्के या निवडणूक लढवत आहेत. मात्र, या दोघींच्या पतींच्या नावाचा साम्यपणा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के हे दोघे नात्याने चुलत भाऊ लागतात.
गावात या दोघांना गावकरी ओळखतात. या दोन्ही महिला उमेदवार एकाच प्रभागातून उभ्या असल्याने निवडणूक बॅनरवर दोन्ही महिलांच्या नावानंतर कल्पेश म्हस्के हे नाव आल्याने सोशल मीडियावर हा बॅनर व्हायरल झाला आहे. मात्र, या एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहोत. विरोधकांनी जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार केला असल्याची प्रतिक्रिया कल्पेश म्हस्के यांनी दिली आहे. दरम्यान, या गोंधळामुळे आम्हाला आणि घरच्या मंडळींना मानसिक त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.