कल्याण - राज्याला केंद्राकडून जीएसटीपोटी किती रक्कम येणार याविषयी महाविकास आघाडीत संभ्रम असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. जीएसटीच्या रक्कमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रक्कमा सांगत आहे. जीएसटी पोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत असे अर्थमंत्री सांगतात, मुख्यमंत्री ३८ हजार कोटी येणार असे सांगत आहेत. कोणी सांगते ६० हजार कोटी रुपये मिळणार नक्की किती पैसे येणार याविषशी संभ्रम आहे. हा संभ्रम सरकारने दूर करावा याकडे मनसे नेते नांदगावकर यांनी लक्ष वेधले आहे.
महाविकास आघाडीने एकत्रित येऊन आधी ठरवावे. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतात. सरकारवर हजारो कोटींचे कर्ज आहे. पैसे आणणार कुठून असा प्रश्न आहे. एका बाजूने सगळे बंद आहे. हळूहळू सगळे व्यवहार सुरू करा. आम्ही म्हणत नाही की डोक्यावर कर्ज घ्या. मनसे हा पक्ष ग्रासरुटवर उतरून काम करतो. कोरोना काळात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. स्वत:च्या खिशात हात घालून गरजूंना मदत केली.
मनसेचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनतेने याची जाणीव ठेवून मनसेच्या पाठी उभे राहिले पाहिजे. तसेच कल्याण डोंबिवली व ग्रामीण भागात मनसेचे आमदार राजू पाटील हे चांगले काम करीत आहे. नाशिकला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे विकास काम करुन दाखविले. त्याची जाणीव जनेतने ठेवून मनसेला साथ दिली पाहिजे अशी आपेक्षा नांदगावकर यांनी व्यक्त केली.
नांदगावकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांच्या हत्येचा योग्य प्रकारे तपास केला जावा. त्याचबरोबर उल्हासनगरातील मनसेचे कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींनाही अटक केली जावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.